जळगाव, राजकीय, सामाजिक

जळगावात लेवा पाटीदार समाजाचा कल ठरणार ‘गेम चेंजर’ !

शेअर करा !
वाचन वेळ : 3 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघात मराठा समाजानंतर सर्वाधीक मतदान असणार्‍या लेवा पाटीदार समुदायाचा कौल हा निर्णायक ठरणार असल्याची बाब स्पष्ट आहे. यामुळे या समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाआघाडीला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आजवर भाजपच्या पाठीशी असणार्‍या लेवा समाजातील अवस्थतेचे वारे हे निकालाची दिशा बदलणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • advt tsh 1
  • advt atharva hospital
  • Online Add I RGB
  • new ad
  • vignaharta

जळगाव लोकसभा मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे मतदान हे सुमारे तीन लाखांपर्यंत आहे. जळगाव महानगरात हा समाज सर्वाधीक असून यानंतर नशिराबाद, आसोदा, भादली, ममुराबाद, कानळदा, नांदेड, साळवा आदींपासून ते थेट चाळीसगावातील वाघळीपर्यंत अनेक गावांमध्ये लेवा समाजाचे मतदार सर्वाधीक आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात आधी काँग्रेससोबत असणारा हा समाज गत सुमारे २५ वर्षांपासून भाजप-शिवसेनेसोबत आहे. मात्र अलीकडच्या काळातही काही घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहरात आमदार आणि महापौर हे दोन्ही याच समाजातील असून नगरसेवकांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र महापालिका निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांना अगदी अचूकपणे ठरवून गारद करण्याचा घातक ‘पॅटर्न’ समोर आला असून याचा हिशोब लोकसभेत चुकता होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खासदार ए.टी. नाना यांच्या दोन वेळेच्या विजयात लेवा समाजाचा एकमुखी पाठींबा हे महत्वाचे कारण होते. आणि नानांनीदेखील लेवा समाजासोबत अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले होते. ए.टी. नाना यांना अनेकदा जुन्या जळगावातील चौकात बसलेले लोकांनी पाहिले आहे. लेवा पाटीदार समाजाच्या या बालेकिल्ल्यात त्यांची नेहमीची बैठक होती. येथेपर्यंत पोहचण्यासाठी उन्मेष पाटील यांना थोडा वेळ लागू शकतो. मात्र यासाठी त्यांच्याकडे तगडे मध्यस्थ आहेत. खुद्द आमदार राजूमामा भोळे यांच्यासह ललीत कोल्हे, विष्णू भंगाळे आदींसारखे मातब्बर त्यांच्या सोबत आहेत. मात्र खडसे समर्थकांनी अद्यापही आपले पत्ते खुले केलेले नाहीत. भारतीय जनता पक्षाने नाथाभाऊंना अगदी अलगदपणे बाजूला काढल्याची सल बाळगणारा मोठा वर्ग जळगावात आहे. महापालिका निवडणुकीत खडसे समर्थक गाफील राहिले. यातच या निवडणुकीत नात्यागोत्याचे राजकारण असल्यामुळे या गटाच्या नाराजीचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र लोकसभेतील दोन्ही उमेदवार लेवाइतर समाजाचे असतांना लेवा समुदायातील खडसे समर्थक हवी ती भूमिका घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. यामुळेच आताच्या निवडणुकीत वेगळा कल समोर येण्याची शक्यता आहे.

लेवा पाटीदार समाजाच्या दृष्टीने विचार केला असता, गुलाबराव देवकर हे मंत्री असतांना त्यांनी आसोदा येथील बहिणाबाईंच्या स्मारकाचे काम मार्गी लावले. यामुळे भव्य स्मारक आकारास येत आहे. यातच आपल्या आमदारकीच्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघातील समाजबांधवांसोबत आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले. तर जळगाव शहरात वास्तव्यास असल्यामुळे त्यांचे आधीपासूनच लेवा पाटीदार समाजासोबत संबंध आहेत. याला खडसे समर्थकांची साथ मिळाल्यास ते भाजपच्या अंमलास धक्का देऊ शकतात. तर भाजपच्या राजवटीत उमविला बहिणाबाईंचे नाव मिळाले आहे. राजूमामा भोळे यांच्यावर भाजपला मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी असल्यामुळे तेदेखील कोणताही धोका पत्करण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.

लेवा पाटीदार समाजाचा नेमका कल कुणीकडे वळेल हे आजच सांगता येणार नाही. मात्र ग्राऊंड रिअ‍ॅलिटी सांगते की, आजवरप्रमाणे भाजपला या समाजातून एकगठ्ठा मतदान होणे अशक्यप्राय आहे. यात सर्वात मोठी भूमिका ही खडसे समर्थकांची असणार आहे. एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आणि त्यांच्या समर्थकांची पक्षात होणारी गळचेपी समाजापासून लपून राहिलेली नाही. अनेकदा सामाजिक व्यासपीठांवरून याला वाचा फोडण्यात आलेली आहे. यामुळे मुक्ताईनगरातून आलेला ‘निरोप’ हा बरेच काही ठरवणारा असेल. याच्या जोडीला गुलाबराव देवकर यांचे वैयक्तीक संबंधदेखील महत्वाची भूमिका बजावतील. तर भाजपला असलेल्या जनाधार टिकवण्याची जबाबदारी ही अर्थातच आमदार राजूमामा भोळे आणि त्यांच्या सहकार्‍यांवर असणार आहे.