राजकीय, राज्य

राजकीय घराण्याची युवा पिढी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार

शेअर करा !

Young Brigade in Vidhansabha Election

मुंबई प्रतिनिधी । राजकीय घराणेशाहीला अनुसरुन आता ठाकरे-पवारांच्या तिसऱ्या पिढीने संसदीय राजकारणात पाऊल ठेवले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चार नातवंडे आपले नशीब आजमावणार आहेत.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता याच न्यायाने राजकीय नेत्यांची मुलंही राजकारणात जाण्याची प्रथा नवीन नाही. ठाकरे, पवार, मुंडे, महाजन, विखे पाटील, मोहिते पाटील ही राजकारणातील मोठी घराणी असून घराणेशाहीला अनुसरुन त्यांच्या दुसऱ्या पिढ्या राजकारणात आल्या होत्या. आता तिसऱ्या पिढीने राजकारणात पाऊल ठेवले आहे. त्यापैकी दोन शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या अध्यक्षांची नातवंडे अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आहे. आदित्य ठाकरे वरळीतून नशिब आजमावणार आहेत. त्यांच्याविरोधात आघाडीचे सुरेश माने रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंसाठी ही लढाई तुलनेने सोपी मानली जाते.

रोहित पवार यांच्यासाठी ही लढाई चुरशीची आहे, तशी प्रतिष्ठेचीही. चुलत भाऊ पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत पाहाव्या लागलेल्या पराभवाची किनार याला आहेच. सोबतच भाजपचे मंत्री राम शिंदे विरोधात असल्यामुळे रोहित पवार यांना विधानसभेत पाऊल ठेवण्यासाठी जीवाचं रान करावं लागेल. तिसरे नातू आहेत शिक्षण सम्राट डी. वाय. पाटील यांचे. अर्थात ऋतुराज पाटील. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ते भाजपच्या अमल महाडिक यांच्याविरोधात मैदानात आहेत. ऋतुराज पाटील यांच्यासाठीही ही लढाई सोपी नाही.

चौथे नातू आहेत ते सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिल देशमुख. 94 वर्षीय आजोबा गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचला आहे. यंदाही आबासाहेबांसाठी मतदारसंघातून नारा घुमला होता. त्यामुळे आजोबांच्या पुण्याईवर नातवासाठी वाट सोपी आहे. याशिवाय भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत कन्या रोहिणी खडसे यांना त्याच म्हणजे जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.