क्राईम, चाळीसगाव, सामाजिक

निकृष्ट कामाची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यास अधिकाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

8aa85794 bcbc 4491 a8f5 59eac1f05a23

चाळीसगाव (प्रतिनिधी) जलयुक्त शिवार बंधाऱ्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार केल्याने ठेकेदारासोबत आलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तालुक्यातील कळमडू येथील शेतकरी संजीव भीमराव पाटील यांनी आज (दि.१५) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून केला आहे.

  • Online Add I RGB
  • advt tsh 1
  • new ad
  • vignaharta
  • advt atharva hospital

 

या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या जलयुक्त शिवार योजने अंतर्गत २५/१२/२०१७ रोजी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या बंधाऱ्याच्या कामाला प्रत्यक्षात दोन वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ५ मे २०१९ रोजी सुरुवात झाली. त्यावेळी ठेकेदाराने सिमेंट बंधाऱ्याच्या कामासाठी नियमानुसार खडी न आणता जाड दगड-गोटे आणले असता आम्ही शेतकऱ्यांनी त्याला आक्षेप घेवून त्याची तक्रार सोशल मिडियाद्वारे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली. त्यानंतर १३ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास तापी महामंडळ अंतर्गत पाटबंधारे विभाग लघुसिंचनचे उपकार्यकारी अभियंता बाळकृष्ण मराठे व कनिष्ठ अभियंता सांगळे हे सदर ठेकेदाराच्या गाडीतूनच बंधारास्थळी आले. त्यांना मी व माझे सहकारी शेतकरी यांनी निकृष्ट बांधकाम साहित्याबद्दल सांगितले असता मराठे यांनी मला अर्वाच्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या अंगावर धावून येत काम बंद करून टाकण्याचीही धमकी दिली. माझ्या सहकारी शेतकरी बांधवांनी त्यांच्या तावडीतून माझी सुटका केली. वरील दोघा अधिकाऱ्यांकडून माझ्या जीवाला धोका असून मला पोलीस संरक्षण मिळावे व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी या निवेदनातून दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री व सहकार राज्यमंत्री यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.