कोर्ट, भुसावळ, सामाजिक

दहशतवादाचा कलंक मिटला; सामाजिक न्यायाचे काय? (व्हिडीओ)

शेअर करा !
वाचन वेळ : 5 मिनिट

जळगाव (प्रतिनिधी) “माई नेम इज़ ख़ान एंड आई एम नॉट ए टेरोरिस्ट”. शाहरुख़ खानने ‘माई नेम इज़ ख़ान’ चित्रपटात पुन्हा-पुन्हा म्हणावे लागले होते की, तो एक ‘दहशतवादी’ नाहीय. परंतु भुसावळच्या सात जणांना खऱ्या जीवनात आजही पुन्हा पुन्हा सांगावे लागतेय की,ते ‘दहशतवादी’ नाहीय. चार महिने जेलमध्ये आणि पंचवीस वर्ष दहशतवादी असल्याचा शिक्का घेऊन जगत असणाऱ्या अकरा जणांची नुकतीच नाशिक टाडा न्यायलयाने निर्दोष मुक्तता केलीय. परंतु उशिरा मिळालेला हा न्याय, अन्यायापेक्षा कमी नाहीय. त्यामुळे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने महाराष्ट्र सरकारला निर्दोष सुटलेल्या तरुणांना भरपाई देण्याची शिफारस केली पाहिजे. कारण दहशतवादाचा कलंक मिटलाय पण सामाजिक न्यायाचे काय?,या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेले नाहीय.

  • ssbt
  • election advt

बाबरी मशीदचा बदला घेण्यासाठी जमील अहमद खान (जाम मोहल्ला,भुसावळ), मोहम्मद युनुस मो.इशाक फलाही(खडका रोड, भुसावळ),युसुफ खान गुलाब खान(टकले कॉलनी, भुसावळ), वासिम असिफ शम्स एजाज (खडका रोड, भुसावळ), शेख शफी शेख अजीज (जाम मोहल्ला), अय्युब खान इस्माईल खान (खडका रोड,भुसावळ), फारुख अहमद नजीर खान,(टकेले कॉलनी,भुसावळ), अब्दुल कादिर हबीब अब्दुल मन्नाम, सय्यद अशफाक मीर मुज्जफार नीर(धोलीवाडा. मध्यप्रदेश), मोहम्म हारून वाफाती अन्सारी (अमतुल्ला अपार्टमेंट, मुबई ) या अकरा जणांनी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील महत्वपूर्ण ठिकाणी बॉम्बच्या सहाय्याने आत्मघाती हल्ल्याचे कट रचल्याचा आरोप होता. या सर्वाना मे १९९४ मध्ये टप्प्याटप्याने अटक झाली होती.

या गुन्ह्यात वरील सर्वाना २०-२२ वर्षाचे असतांना जेलमध्ये टाकले गेले होते. आता हे सर्वजण नातू-पणतूचे झाले आहेत. यातील मोहमद फलाही हे डॉक्टर तर फारुख अहमद नजीर खान हे इलेक्ट्रोनिक इंजिनिअर आणि शफी पेहलवान हे विद्यमान नगरसेवक होते. डॉ फलाही यांचे स्वप्न होते की, भुसावळ शहरात एक गरिबांसाठी चॅरीटी रूग्णालय सुरु करायचे होते. तर इंजिनिअर फारुख अहमद यांना परदेशात नौकरी करून आई-वडिलांसाठी खूप पैसा कमवून त्यांना आनंदी ठेवायचे होते. तर शेख शफी यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या शहराचा विकास करावयचा होता. परंतु या सर्वांच्या स्वप्नांवर आज पाणी फेरले गेलेय. हातातून वाळू निघते,त्याच पद्धतीने त्यांच्या जीवनातील उमेदीचा काळ निघून गेलाय. तत्कालीन डीवायएसपी दीपक जोग या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केली म्हणून त्यांनी आम्हाला या खोट्या प्रकरणात अडकवले असल्याचे या सर्वांचे म्हणणे आहे.

शफी पेहलवान यांच्या परिवारातील सदस्य मागील ३० वर्षापासून जाम मोहल्ला प्रभागाचे नेतृत्व करतेय. या प्रभागात मुस्लीम बरोबर हिंदू समाजाचे देखील मोठ्या प्रमाणात मतदान आहे. त्यामुळेच आपल्या राष्ट्रप्रेमावर आणि धर्मनिर्पेक्षतेवर निर्माण केले गेलेले प्रश्नचिन्ह आजही एक लोकप्रतिनिधी म्हणून शफी पेहलवान यांना अस्वस्थ करतात. माझा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात हिंदू एवढेच नव्हे तर, माझे गुरु देखील हिंदूच असे असतांना देखील मला हिंदूद्वेष्टा म्हणून समाजासमोर उभे केले गेले. माझ्यावरील लोकांचा विश्वास आजही कायम आहे. परंतु माझ्या अंतरमनाला झालेली जखम कशी भरून काढू? असा सवाल ते पोलीस प्रशासनाला विचारतात.

इलेक्ट्रोनिक तथा टेलीकम्युनिकेषण इंजिनिअरिंग केलेले फारुख अहमद हे भिवंडीला एका आयटीआयमध्ये प्राध्यापक म्हणून नौकरी करत होते. विद्यार्थीप्रिय असलेले फारुख अहमद सांगतात, त्यांना आपले विद्यार्थ्यां आणि सहकारी यांच्यासमोर अपमानित व्हावे लागणे, ही आयुष्यातील सर्वात मोठी दुःखत घटना असून त्यामुळे इतक्या वर्षानंतर आजही रात्री सुखाची झोप येत नाही. ज्या विद्यार्थ्यांना मी विज्ञान शिकवून राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावण्यासाठी तयार करत होतो, त्यांच्यासमोरच मला देशद्रोही म्हणून अटक करण्यात आली. कुणाच्याही जीवनात असा कटू प्रसंग येऊ नये. आई जिवंत असतांना निर्दोष सिद्ध झालो असतो, तर मनावर कुठलेही ओझं राहिलं नसते. पण सुदैवाने किमान माझ्या वडिलांच्या समोर निर्दोष झालो, याचा मला आनंद आहे.

उकृष्ट स्वयंपाकी असलेले जमील अहमद खान हे अनेक वर्षापासून हिंदू-मुस्लीम समाजात विविध कार्यक्रमात स्वयंपाक करताय. अगदी त्यांची मुलाखत घेण्यास गेलो, त्या दिवशी देखील ते भुसावळमधील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्यासाठी जाण्याच्या धावपळीत होते. जमील खान यांच्यावरच सर्वात मोठा आरोप होता की, ते काश्मीरमध्ये जाऊन विविध शस्त्र आणि बॉम्ब बनविण्याची ट्रेनिंग घेऊन आले आहेत आणि तेच भुसावळमधील इतर तरुणांना शस्त्र आणि बॉम्ब बनविण्याचे शिकवत होते. पडक्या घरात राहणारे जमील खान उतरत्या वयात आपल्या परिवाराचे उर्वरित आयुष्य सुखी करण्यासाठी धडपड करताय.

निर्दोष सुटल्यानंतरही संशयित आत्मघाती हल्लेखोर म्हणून आजही मिडिया आम्हाला संबोधते. या सर्वांचे म्हणणे आहे की, पोलीस आणि मिडिया यांच्या विकृतीमुळे आजही त्यांच्या नावासमोरील ‘टेरर टैग’ मिटत शकत नाहीय. तर दिल में कोई मलाल है? या प्रश्नावर थेट उत्तर न देता त्यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या की, त्यावरून लक्षात आले की, हे सर्व विसरून ते भविष्याकडे बघणं पसंत करताय. भले पोलिसांनी अन्याय केला. पण कोर्टाने न्याय दिला. त्यामुळेच सर्व अपमान,दु:ख, पिडा सहन करून देखील देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास कायम असल्याचे ते म्हणताय.

मानसिकदृष्ट्या आजही हे सर्वजण चार महिन्याची जेल आणि पंचवीस वर्षाचा न्यायालयीन लढा विसरू शकत नाहीय. आजही या सर्वाना भीती वाटते की, कुठे लग्नात, कार्यक्रमात गेलो तर त्याठिकाणी पुन्हा पोलीसं येतील आणि आपल्याला पकडून नेतील. या गुन्ह्यानंतर नातेवाईक,मित्र मंडळी सर्वजण अंतर ठेवून वागत होते. एकंदरीत मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरदेखील आम्ही टेरर टैगच्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा आजही प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मागील पंचवीस वर्षात नाशिक टाडा कोर्ट ते सुप्रीम कोर्ट हा प्रवास प्रचंड वेदनादाई होता. पोलिसांनी चार्जशीट दाखल करण्यासाठी आणि राज्य सरकारने न्यायाधीश आणि विशेष सरकारी वकील नेमण्यासाठी तब्बल २४ वर्षाचा कालावधी घेतला. आम्हाला दोषी ठरावा किंवा निर्दोष सोडा, पण या कलंकांवर काही तरी निर्णय घ्या,अशी विनवणी सर्वांनी न्यायालयात केली. अखेर सुप्रीम कोर्टाने एका वर्षाच्या आत निकाल देण्याचे आदेश दिल्यानंतर मार्च २०१९ मध्ये नाशिक टाडा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलीय. कारण पोलीस पुरावा देऊ शकली नाही.

आज देशात कुठेही बॉम्बस्फोट झाला तर दुसऱ्या क्षणाला भारतातील मुस्लिमांच्या मनात भीती पसरते. घरातील फोन वाजायला सुरुवात होते. आई-वडील आपल्या मुलांना घराबाहेर निघू नको म्हणून ताकीद देतात. हे फक्त एवढ्या करता होते की,प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर मीडियात मुस्लिमांचे नाव समोर येते. मुळात प्रश्न मुस्लीमांनाच प्रत्येकवेळी आपली देशभक्ती का सिद्ध करावी लागते?

दोषी असल्यानंतर शिक्षा भोगणे आणि निर्दोष असून देशद्रोही सारखा कलंक डोक्यावर घेऊन जगणे, यापेक्षा मोठी शिक्षा जगात कुठलीच असू शकत नाही. कारण उशिरा मिळालेला न्याय हा एकप्रकारे अन्यायच असतो आणि अशा अन्यायग्रस्त लोकांसाठी सरकार,राजकारणी तसचं समाजाने विचार करण्याची वेळ आली आहे. शेवटी सर्वजण जीवन तर जगणारच आहेत. पण आयुष्याचा उमदीचा काळ आणि सामाजिक प्रतिष्ठा त्यांना कोण परत आणून देणार आहे? या प्रश्नांचे उत्तर आता पोलीस प्रशासनाने दिले पाहिजे.

पहा : टाडाच्या खटल्यातून निर्दोष मुक्त झालेल्यांचा संघर्ष विशेष वार्तापत्राच्या स्वरूपात.

Leave a Comment

Your email address will not be published.