जळगाव, राजकीय

Exclusive : भाजपचे धक्कातंत्र…अभियंता प्रकाश पाटील यांना मिळणार जळगावची उमेदवारी ?

शेअर करा !
वाचन वेळ : 3 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तिकिट हे अभियंता प्रकाश पाटील यांना मिळणार असल्याचे निश्‍चीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप श्रेष्ठींनी या धक्कातंत्राला मंजुरी दिल्याचे समजते.

  • advt atharva hospital
  • new ad
  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • vignaharta

राजकीय स्थितीत बदल

जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार अर्थात ए.टी. पाटील आणि रक्षाताई खडसे यांना भाजपचे पुन्हा तिकिट मिळणार असल्याचे निश्‍चित मानले जात होते. यापैकी रक्षाताई खडसे यांच्या नावाला तर पक्षातून कुणाचा विरोधदेखील नसला तरी ए.टी. पाटील यांच्याऐवजी अन्य नेत्यांनी उत्सुकता दाखविली होती. यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या नावाचा समावेश होता. यात जळगाव येथील अभियंता प्रकाश पाटील यांचे नावदेखील घेतले जात होते. आता बदलत्या राजकीय स्थितीच्या पार्श्‍वभूमिवर भाजपचे तिकिट हे प्रकाश पाटील यांनाच मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

जलतज्ज्ञ म्हणून भरीव कामगिरी

प्रकाश पाटील हे मूळचे खेडगाव नंदीचे (ता. पाचोरा) येथील रहिवासी होत. त्यांचे वडील रघुनाथ पाटील हे जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यांनी बी.ई सिव्हील इंजिनिअरींगची पदवी संपादन केली आहे. सार्वजनीक बांधकाम खात्यामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असतांना त्यांनी नोकरीचा राजीनामा देत व्यवसायात पदार्पण केले. यानंतर मे. पी.आर. पाटील इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स या फर्मच्या माध्यमातून त्यांनी जलसंपदा खात्याच्या कामांसाठी कन्सल्टींगची सेवा सुरू केली. विशेष करून धरण व बंधार्‍यांच्या डिझाईनमध्ये ते ख्यातप्राप्त असून आज ते या क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात. जिल्ह्यातील बहुतांश जलसिंचन योजनांचे सल्लागार हे प्रकाश पाटील हेच असल्याची बाब कुणाला फारशी ज्ञात नाही. आजवर सातत्याने लो-प्रोफाईल पध्दतीत राहणारे प्रकाश पाटील हे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जातात.

विजयरथ कायम ठेवण्याचे गणित

जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रकाश पाटील यांच्या नावाने कोरी पाटी असणारा व उच्च शिक्षित उमेदवार देऊन भाजप जोरदार आव्हान उभे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाटील यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांची भेट घेतली असून त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचा विजयरथ हा सुरूच राहण्यासाठी प्रकाश पाटील यांना पक्षाची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. त्यांच्यासाठी ना. गिरीश महाजन हे आग्रही असल्याची बाबदेखील त्यांच्या पारड्यात भर टाकणारी ठरली आहे.

जळगावकरांमध्ये लढत

राष्ट्रवादीची उमेदवारी आधीच गुलाबराव देवकर यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून भाजपची उमेदवारी प्रकाश पाटील यांना मिळण्याचेही संकेत मिळाले आहेत. यामुळे पहिल्यांदाच खासदारकीसाठी दोन जळगावकरांमध्ये टक्कर होणार आहे. आता एक गमतीशीर योगायोग असा की, गुलाबराव देवकर यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर प्रकाश पाटील यांचे कार्यालय आहे. तर त्यांचे निवासस्थानदेखील देवकरांच्या घराच्या मागील बाजूस समर्थ कॉलनीत आहे.