भुसावळ, राजकीय

भुसावळातील पैसा रावेर-यावलमध्ये चालणार : जगनभाईंच्या आरोपांनी धमाल !

शेअर करा !

jagan sonavane bhusawal
भुसावळ प्रतिनिधी । माजी आमदार संतोष चौधरी हे भुसावळातील आपल्या उमेदवाराकडून रग्गड पैसा घेऊन तो रावेर-यावलमध्ये वाटणार असल्याचा आरोप महाआघाडीचे उमेदवार जगनभाई सोनवणे यांनी केल्याने धमाल उडाली आहे. याच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्याने चौधरी बंधूंसह डॉ. मधू मानवतकर यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच याचा दोन्ही मतदारसंघावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

भुसावळात आमदार संजय सावकारे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी-पीआरपी महाआघाडीचे उमेदवार जगन सोनवणे आणि अपक्ष डॉ. मधू मानवतकर यांच्यात प्रमुख लढत आहे. सतीश घुले यांना संतोष चौधरी यांनी ऐन वेळी धोका दिल्याने ते सुध्दा अपक्ष उभे आहेत. अर्थात, भुसावळात बहुरंगी लढत होत असून चौधरी यांच्या गटाने आपली सर्व शक्ती डॉ. मधू मानवतकर यांच्या पाठीशी उभी केली आहे. स्वत: संतोष चौधरी हे त्यांच्या प्रचाराचे नियोजन करत असून प्रचारात चौधरी समर्थक सहभागी झालेले आहेत. तर दुसरीकडे चौधरींनी आघाडी धर्माला हरताळ फासल्यामुळे संतप्त झालेले जगनभाई सोनवणे यांनी संतोष चौधरी यांनाच टार्गेट केले आहे. आपल्या प्रचारात ते सातत्याने मांडत असलेला एक मुद्दा हा राजकीय वर्तुळच नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. जनगभाईंच्या मते ”संतोष चौधरी यांच्यासाठी निवडणूक म्हणजे रग्गड कमाई करण्याची सुवर्णसंधी असते. गेल्या निवडणुकीत त्यांनी अ‍ॅड. राजेश झाल्टे यांना फसविले होते. तर आता डॉ. मधू मानवतकर यांच्याकडूनही ते मोठी रक्कम घेणार असून हीच रक्कम रावेर विधानसभा मतदारसंघातून उभे असणारे त्यांचे बंधू अनिल चौधरी यांच्यासाठी वापरणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.”

जगनभाई सोनवणे यांच्या या आरोपांमुळे भुसावळ आणि रावेर विधानसभा मतदारसंघातील समीकरणावर परिणाम होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सोनवणेंच्या आरोपांनी मानवतकर दाम्पत्य सावध झाले असून ते प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलत आहेत. विशेष करून आर्थिक बाबींमध्ये ते स्वत: लक्ष घालत आहेत. तर भुसावळातून मोठ्या प्रमाणात पैसा येणार असल्याची ”खबर” ही रावेर व यावल तालुक्यातील अनिल चौधरी यांच्या समर्थकांना लागताच त्यांच्या अपेक्षादेखील उंचावल्या आहेत. त्यांचीही ”डिमांड” वाढू लागली आहे. आता या दोन्ही घटना एकाच साखळीशी जुडलेल्या असल्यामुळे नेमके करावे तरी काय ? हा पेच डॉ. मधू मानवतकर आणि चौधरी बंधूंसमोर उभा ठाकल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम भुसावळ आणि रावेर मतदारसंघात होण्याची शक्यतादेखील बळावली आहे. तर दुसरीकडे चौधरींच्या जनाधार आघाडीत उभी फूट पडली असून काही नगरसेवक हे आमदार संजय सावकारेंसोबत, काही जगनभाई सोनवणे यांच्यासोबत तर काही डॉ. मधू मानवतकर यांच्यासोबत प्रचारात दिसत आहेत. अर्थात, निकाल काहीही लागला तरी जगनभाईंच्या आक्रमकतेमुळे ही निवडणूक अनेक वर्षे स्मरणात राहणार आहे.

दरम्यान, शेवटच्या टप्प्यात भुसावळातील सर्वच उमेदवारांनी आपापल्या परीने जोरदार प्रचार सुरू केला असून मतदार नेमका कुणाला कौल देणार हे चित्र निकालाद्वारे स्पष्ट होणार आहे.