क्राईम, जळगाव

आंतरजातीय प्रेमविवाह फसल्याने तरुणी हताश : आधारासाठी याचना

शेअर करा !

Crime Lady

जळगाव (जितेंद्र कोतवाल)। शहरातील बालाजी पेठेत राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीचे जीवन तिने दोन वर्षांपूर्वी केलेल्या आंतरजातीय आणि फसलेल्या विवाहामुळे नरकासमान झाले आहे. आज ही महिला निराधार अवस्थेत महिला आधार आश्रमात आश्रय मिळावा म्हणून पोलिसांकडे केविलवाणी विनंती करीत आहे. आयुष्यात एक निर्णय चुकल्याने या महिलेला पुन्हा सन्मानाने जगण्याची संधी मिळणे एवढे अवघड व्हावे, ही बाब २१ व्या शतकातल्या आपल्या सुशिक्षित समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. याबाबत सगळ्या समाजधुरिणांनी गहन विचार करण्याची गरज आहे.

advt tsh 1

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, या तरुणीचे सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेम जुळले, त्यानंतर त्यांनी दोघांची जात वेगवेगळी असतानाही कुटुंबाच्या विरोधात जावून विवाहाचा निर्णय घेतला. दोघांचा विवाह १८ डिसेंबर २०१६ रोजी झाला. तेव्हापासूनच तिच्या आयुष्याचे फासे उलटे पडू लागले. लग्नाआधी असलेले तिच्या पतीचे दारूचे व्यसन प्रचंड बळावले. त्या व्यसनाने त्याचा घात केला आणि ३० मार्च २०१९ ला त्याचा मृत्यू झाला. दरम्यान तिने मनाविरुद्ध विवाह केल्याने तिच्या माहेरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. तिच्या पतीच्या क्रियाकार्मातही ते नावापुरतेच उपस्थित होते. तिच्या सासरी सासुनेही तिला ‘तुझ्यामुळे माझा मुलगा गेला’ असा आरोप करून अव्हेरले. मध्य प्रदेशात राहणाऱ्या काकाने तिला काही काळ सांभाळले, पण तिथेही तिचा कायमस्वरूपी राहण्याची सोय होऊ शकली नाही. अशाप्रकारे पती निधनानंतर अक्षरशः दोन महिन्यात ती निराधार होवून रस्त्यावर आली आहे. अशा अवस्थेत तिने शानिपेठ पोलिसांकडे मदत मागून स्वत:ला महिला आधार आश्रमात पाठवण्याची विनंती केली. त्यातच ती गर्भवती असल्याचीही शंका पोलिसांना आल्यामुळे त्यांनी तिची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली आहे. अद्याप तपासणीचा अहवाल आलेला नाही. एकूणच या महिलेच्या आयुष्याची एका चुकीच्या ठरलेल्या निर्णयामुळे वाताहत झाली असून तिला सुरक्षित जीवन जगता यावे म्हणून ठोस आधाराची गरज आहे. त्यासाठी समाजाने व तिच्या कुटुंबीयांनी मागील घटना विसरून तिला आधार द्यावा, यासाठी किंवा एखादया समजदार तरुणाशी तिचा दुसरा विवाह व्हावा, यासाठी महिलांच्या संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.