धरणगाव, राजकीय

…आणि गुलाबराव पाटलांनी बारामतीच्या विकासाचे केले कौतुक !

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबावर टिका करणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चक्क बारामतीच्याच विकासाचे कौतुक केल्याचे आक्रित आसोदा येथे घडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

advt tsh 1

याबाबत वृत्त असे की, राजकीय विरोधक असल्यामुळे गुलाबराव पाटील हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते व त्यातही पवार कुटुंबावर सातत्याने टीका करत असतात. मात्र आसोदा येथील कार्यक्रमात त्यांनी चक्क बारामतीच्या विकासाचे कौतुक केल्याने सर्व जण आश्‍चर्यचकीत झाले आहेत. आसोदा येथे रविवारी विविध विकासकामांचे लोकार्पण झाले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटील यांनी आपण मतदारसंघात १,२०० कोटी रूपयांची कामे केली असल्याचे सांगून बारामतीपेक्षा जळगाव ग्रामीण मतदारसंघ अधिक सुंदर करणार असल्याची घोषणा केली. अर्थात, ना. पाटील यांनी बारामतीमध्ये विकास झाल्याचे मान्य केल्याचे यातून दिसून आले. तसेच त्यांना शिवसेना वा मित्रपक्ष भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या मतदारसंघाचा दाखला द्यावा असे सुचले नाही. यामुळे कट्टर विरोधी पक्षनेत्याच्या मतदारसंघाचे कौतुक करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.