राजकीय

…हे तर नाथाभाऊंच्या २२ वर्षांच्या पाठपुराव्याचे फळ- डॉ. अभिषेक ठाकूर

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी तब्बल २२ वर्षे पाठपुरावा केला असून याला मिळालेली मंजुरी ही याचेच फळ असल्याचा खुलासा डॉ. अभिषेक ठाकूर यांनी केला आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राला नुकतीच मंजुरी मिळाली असून याच्या श्रेयनामाचा वाद आता उफाळून आला आहे. राज्य सरकारकडून याला मंजुरी देतांना अधिकृत प्रेस नोटमध्ये या कामासाठी ना. गिरीश महाजन यांचे परिश्रम कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रयत्न केले असून १९९७ साली या योजनेचे भूमिपूजन करण्यात आल्याची छायाचित्रे त्यांच्या समर्थकांनी शेअर केली होती. दरम्यान, पहिल्यांदा पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात मात्र राज्य राखीव दलास मंजुरी मिळाली होती. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने हे श्रेय गिरीश महाजन यांचेच या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या संदर्भात भाजपचे सोशल मीडिया पदाधिकारी डॉ. अभिषेक ठाकूर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना या प्रकरणी खरा पाठपुरावा हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीच केला असल्याचे नमूद केले.

डॉ. अभिषेक ठाकूर म्हणाले की, १९९७ साली वरणगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली होती. यानंतर त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. या वर्षाच्या प्रारंभी आ. खडसे यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. यात अन्य विषयांसोबत वरणगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राऐवजी राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत सर्व प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रकाशितदेखील झाले आहे. खुद्द डॉ. ठाकूर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. यामुळे वरणगाव येथील राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र हे खर्‍या अर्थाने माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या २२ वर्षांच्या पाठपुराव्याचेच फलीत असल्याचे प्रतिपादन डॉ. अभिषेक ठाकूर यांनी केले आहे. ते म्हणाले की, ही कामे जिल्हावासियांसाठी महत्वाची असून यासाठी नाथाभाऊंनी पाठपुरावा केला आहे. तथापि, याबाबत कुणी संभ्रम निर्माण करू नये असे आवाहनदेखील त्यांनी याप्रसंगी केले.

दरम्यान, डॉ. ठाकूर यांनी आपल्या खुलाशाच्या प्रित्यर्थ संबंधीत बैठकीचे वृत्त असणारे वृत्तपत्रांचे कात्रणेदेखील सादर केलेली आहेत. याला आपण त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून पाहू शकतात.