ट्रेंडींग, विशेष लेख

भुलाबाई – खान्देशी मुलींच्या भावजीवनाचा अविभाज्य घटक (ब्लॉग)

शेअर करा !

bhulabai

आज भाद्रपद पौर्णिमा ! पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत मानला जातो तो पितृपक्ष, त्याचे काही आम्हा मुलांना विशेष वाटत नसे, कारण त्यांत काहीही समजत नसे ! मात्र अजून एक महत्वाचे कुतूहल असायचे, कारण भाद्रपद पौर्णिमा ते अश्‍विन पौर्णिमा हा आमच्या लहानपणी, मुलींचा आवडता महिना असे आम्ही समजायचो. त्या दिवसापासून त्यांच्या भुलाबाई सुरु व्हायच्या, ते थेट एक महिनाभर. खान्देशातील मुलींच्या भावजीवनाशी एकरूप झालेल्या भुलाबाई बाबत ख्यातप्राप्त विधीज्ज्ञ अ‍ॅड. माधव भोकरीकर यांचा हा लेख.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

गणेशोत्सव आता संपला, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणराया पुढील वर्षी येण्यासाठी जाणार ! त्यानंतर दुसर्‍या दिवशी पौर्णिमा, ती आली, की मुलींचा उत्सव येतो, अगदी महिनाभर ! ‘भुलाबाई भुलोजी’ येतात, भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्‍विनी पौर्णिमेपर्यंत म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत !

”आमचे गणपती फक्त दहा दिवस असतात. जो असेल तो प्रसाद ! हे ओळखा ते ओळखा, ही नाटकं नाहीत. बिचारे सरळ ! बुद्धीची देवता आहे ना, म्हणून ! आणि तुमच्या भुलाबाया ! त्या एकदा आल्या, की महिनाभर हलायचं नांव घेत नाही. पुन्हा त्यांना इतके सगळे रोज वेगवेगळे खाऊ, नुसत्या खादाड !” लहानपणचा हा आम्हा मुलांचा, आमच्या बहिणींशी म्हणजे घऱातल्या व गल्लीतल्या, हा संवाद कायम ठरलेला. हे असे ऐकल्यावर कोणा बहिणींना मग राग येणार नाही ?
यांवर ”अहाहा काय ते उंदरावर बसणं आणि मोदक खाणे ! नुसते खाऊन खाऊन स्वत:चे केवढे मोठं पोट करून ठेवले आहे ?” —हे म्हणत आमच्या या बहिणाया त्यांच्या मैत्रिणींना सोबत घेवून अगदी तालात वेडावत म्हणायच्या-

केवढे मोठे पोट, मांडीचे हे लोट ।
उंदराची गाडी कशी तुरूतुरू चाले ॥

‘आमचे पहा, भुलोजीचा हा पांढरा शुभ्र धिप्पाड नंदी आहे वाहन ! तर आमच्या भुलाबाईचा वाहन, तर सिंह आहे सिंह !’ येथे समस्त बहिणाबाई वर्ग, सिंहाच्या आवाजात ‘सिंऽऽह’ असे म्हणून, ‘कोठे सिंह अन् कोठे उंदीर’ ? असे सिंह म्हणतांना एकदा आकाशाकडे व उंदीर म्हणतांना जमिनीकडे बोट दाखवत म्हणत ! यांवर कडी करत शेवटी – ‘अन् पहा, तुमचा हा गणपती, आमच्या भुलाबाईच्या मांडीवर बसला आहे; उठायला तयार नाही. म्हणे बुद्धीची देवता !’ या समस्त बहिणाबाई इतक्या तडाख्यात आम्हा गणेशभक्तांना चूप करत, की मग लक्षात येई, मफक्त बुद्धीच्या देवतेचे उपासक असून चालत नाही, तर अशातर्‍हेने भांडून समोरच्याला नामोहरम करण्याची बुद्धी उपजत असावी लागते. ती समस्त बहिणायांजवळ, महिलावर्गाजवळ उपजतच असते. अर्थात हे त्यावेळी समजण्याचे वय नव्हते, हे जरा आताशी कुठे समजायला लागले आहे.

आमच्या बहिणायांकडून इतके जमिनीवर आदळल्यावर, पण धीर न सोडतां ”मग परिक्षेच्या वेळी कसे मुकाटयाने येतात गणपतीकडे आमच्या, की ‘आम्हाला पास कर’ म्हणून सांगायला ?” हा दम नसलेल्या आवाजातील आमचा शेवटचा मौखिक वार !
”हँ, गणपतीलाच आम्हाला सांगावे लागते, मतुझ्या आईवडिलांचे ऐक. मग तो न ऐकून सांगेल कोणाला ?” यांवर आमचा सपशेल पराभव !
”मारे एवढे सांगता तर किती मार्क पडले परिक्षेत ?” आमच्याकडून निष्कारणच मधाच्या पोळ्यावर दगड ! मग काय विचारतां ? एकदोन जणांचा अपवाद वगळता, मार्कांच्या बाबतीत पण गणपती त्यांनाच सामील ?
”अरे, आम्ही आपली बुद्धीची देवता म्हणून तुझी भक्ती करतोय, दहा दहा दिवस दारोदार फिरून तुझी आरती करतोय, मिळणार्‍या प्रसादाकडे लक्ष न देता ! आणि तू खुशाल त्यांना मार्क जास्त देतोय ! काय म्हणावे तुला ?” आमच्या मनांतील प्रश्‍न चेहर्‍यावर दिसायला लागतात. आम्हाला या बुद्धीच्या देवतेचीच शंका यायला लागते. हा आमचे ऐकतो, की त्याच्या आईबाबांचे ? या याच्याबद्दल इतकं बोलतात, पण हा त्यांना धडा शिकवत नाही.

शेवटी आम्हालाच मग ”तू मला दळण आणायला सांग, मग पहा मी आणतो का ?” असे म्हणायचे तर ”तुला धुणे धुवायच्या वेळेला आडाचे पाणी ओढून देतो का पहा ? तर बाजारातून मला भाजी किंवा काही आणायला तर सांग, मग पहा ?” असे सर्व बंधू अस्त्रे उगारून सज्ज झाले, अन् या रोजच्या व्यवहाराच्या पातळीवर उतरले, की मग स्वर एकदम खाली यायचा या बहिणायांचा ! मग आम्ही ऐटीत तेथून निघायचो, बुद्धीच्या उपासकाला नमवायला निघाल्या होत्या या !

खान्देशात भुलाबायांचा हा उत्सव, मुलींसाठी म्हणजे अगदी पर्वणी ! भाद्रपद पौर्णिमेला या भुलाबाया बसल्या, की सर्वांच्या घरातील वातावरण कसे सायंकाळी गजबजून जात असे. कारण घरातील, शेजारपाजारच्या छोट्या, किशोरवयीन मुली एकमेकांकडे जाणे ! टिपर्‍या घेवून, एकमेकींना गोळा करत जाणे ! काही वेळा एखादी जवळ टिपरीचा जोड नसायचा, पण तरी ती यायची, की गाण्याच्या वेळी टाळ्या वाजवतां येतील, त्यांत काय मोठेसं ! मग कोणाच्यातरी लक्षात आले की हिच्याजवळ टिपर्‍या नाहीत, मग शेजारची तिला तिच्या जवळची एक टिपरी देई, आणि सर्वांना आपापसांत एकत्रित टिपर्‍या खेळता येई ! किंवा मग तिने अगोदरच तसे सांगीतले, तर मग कोणीतरी टिपरीचा दुसरा घरातील जुना पडलेला जोड देई, आणि वेळ भागवून नेई. टिपरीचा जोड त्यावेळेस फार तर रूपया-सव्वा रूपयाला मिळे, पण तेवढेही पैसे खर्च करून टिपरीचा जोड मुलीसाठी घेऊन देणे, काही वेळा कठीण असे. एखादी मुलगी मग बिचारी रडवेली होत हट्ट करायची, ”माझ्याजवळ टिपर्‍या नाही. सर्वांजवळ असतात. मी खेळायला जाणार नाही.” तिची अगतिक माता काय करणार यांवर ? मुली बोलवावयास आल्यावर, तिला नाही म्हणणे जिवावर येई. टिपर्‍यांच्या जोडाअभावी त्या लहान, निरागस, जगातील दु:ख व अडीअडचणींची झळ न पोहोचलेल्या, त्या चिमुरडीला नाराज करणे ! त्या मातेला वाईट वाटे. मग ती म्हणे, ”मुलींनो, तुम्ही आल्या आहे नं, मग आमच्याचकडे करा सुरूवात. मी खाऊ करते तोपर्यंत !” मग ही, आईला खाऊ काय हवा, हे सांगायला घरात जाई व मुलींचे भुलाबाईचे पहिले गाणे सुरू होई –

भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला

यानंतर मग एका पाठोपाठ गाणी सुरू होत —

यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
सासूबाई गेल्या समजावयाला
चल चल सूनबाई अपुल्या घराला

नंतर
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू

नंतर
आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,
लेकी भुलाबाई साखर्‍या लेवून जाय
कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,
घरी नंदा जावा, करतील माझा हेवा

नंतर
अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या

नंतर
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥

नंतर
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होतं ताम्हन
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा वामन

नंतर
पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी
अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्याने वेळवीला भात
जेविता कंठ राणा भुलाबाईचा.

रोज सर्वच गाणी म्हटली जात नसत कारण सर्वांची घरे झाली पाहिजेत. गाण्यामधे मात्र काटछाट नाही. सर्व आटोपले की शेवटचे गाणे मला आठवते –

माझे काम संपले आता आणा खाऊ
खारणी का गोडणी, आंबट तिखणी ?

मग खाऊ ओळखणे, हे सुरू होई, प्रत्येकालाच आपण आजचा खाऊ ओळखावा असे वाटे. मग कोणी काही सांगे, तर कोणी काही ! काही तर आपल्याला काय खाऊ हवा, ते नांव सांगत. ओळखतां आला नाही, तर खाऊची वाटी, तरसाळे, डबा मुलींसमोर हलवून दाखवावा लागे, मग त्या आवाजाने मुलींकडून पुन्हा वेगवेगळी नांवे पुढे येत, पण त्यातूनही ओळखतां आले नाही, तर मग महिंटफ मागीतली जाई – मखारणी, गोडणी का काय ?फ पण हे, जिच्या घरचा खाऊ असे तिला अभिमानाचे, तर इतर मुलींना कमीपणाचे असे. मग हिंट दिली जाई, ती खाऊच्या चवीप्रमाणे मगोड म्हणजे गोडणी, तिखट म्हणजे तिखणी वगैरे म अन् पुन्हा ओळखण्याचे सुरू होई. हा प्रकार जोपर्यंत खाऊ ओळखला जात नाही, तोपर्यंत चाले, अन्यथा हार कबूल करावी लागे.

खाऊ ओळखला जावू नये, म्हणून मग त्यांवर फडके टाकून हलवले जाई, म्हणजे नीट आवाज येत नसे, किंवा दोन-तीन चवीचा खाऊ केला जाई, म्हणजे नेमके समजायला कठीण ! त्यावेळी आम्हा मबंधूमंडळींनाफ तिथं उभं रहाण्यास बंदी असे, कारण आम्ही सह्रदयतेने, किंवा मुद्दाम खाऊ कोणता ते नांव फोडू, म्हणून काळजी घेतलेली असे. पण कसे कोण जाणे खाऊ ओळखला गेला, आणि आम्ही तेथे असलो, तर पहिला संशय आमच्यावर, म्हणजे सर्व बंधूंवर येई. त्यानंतरचा गोंधळ व रडारड काय विचारतां ? शेवटी उद्या दोन खाऊ आणि भावाला घराबाहेर, या अटींवर तडजोड होई, आणि ही बहिणाई दुसर्‍या घरी गाणे म्हणायला जाण्यास सज्ज होई.

एखादीचा भाऊ खूपच लहान असेल, तर मग तो दुसर्‍या घरी ममी येतोफ म्हणून मागे लागे. ती मातोश्री काय करणार ? ”याला पण घेऊन जा तुझ्याबरोबर”, म्हणून सांगे पण त्या बहीणीला ते कबूल नसे, अपमानास्पद वाटे. ”कोणाचे भाऊ येतात का कोणाबरोबर, हाच का येतो ? बायकांत पुरूष लांबोडा !” बहिणाईची ‘बायका व पुरूष’ हे शब्द समजत नसतांना तणतण ! मग गल्लीतील एखादी कनवाळू बहिण, त्या भाऊरायाच्या पाठीशी येई, आणि मग ‘चल माझ्याबरोबर ! नीट हळू चल !’ असे म्हणत तिच्या जवळच्या टिपर्‍या, त्याच्या बहीणीजवळ देई, व त्या भाऊरायाला बोट धरून, कडेवर, जशी परिस्थिती असे तशी घेऊन जाई.

रूपया-सव्वा रूपयाचा टिपरीचा नवीन जोड स्वत:च्या मुलीला दरवर्षी घेता येत नसणारे घर आम्ही जसे पाहिले, तसेच आपल्या जवळचा जोड त्या रडणार्‍या मुलीस देवून, किंवा आपण सर्व एकाच टिपरीने एकमेकांशी खेळू, किंवा टाळ्या वाजवत खेळू म्हणणार्‍या बहिणी आम्ही येथे पाहिल्या ! सख्खेचुलत याची काही कल्पना नसणारे आम्ही, शेजारची पण बहीण आपल्याला खेळायला घेऊन जाते हे पाहिले. कोजागिरीच्या रात्री दूध चंद्रप्रकाशात ठेवून ते प्यायले, तर त्याच्यात ही अशी औषधी गुणधर्म उतरतात व मनांवर, शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो, हे ऐकले आहे. अलिकडे अशा होणार्‍या भुलाबाया व कोजागिरी पौर्णिमा बंद झाल्या की काय, म्हणून हे सर्व बदलले आहे देव जाणे.

ad madhav bhokrikar
अ‍ॅड. माधव भोकरीकर

( प्रस्तुत लेखक हे मूळचे रावेरकर असून सध्या औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वकील म्हणून कार्यरत आहेत. गाव सुटले तरी मातीची ओढ कायम असल्याचे त्यांच्या लिखाणातून नेहमी दिसून येते. हा लेख त्यांच्या https://madhavbhokarikar.blogspot.com या ब्लॉगवरून साभार घेतला आहे. )