अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, रावेर

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात अंदाजे 58 टक्के मतदान

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर या 11 विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरु झाले. दिवसभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा क्षेत्र निहाय झालेल्या मतदानाची अंदाजे टक्केवारी पुढील प्रमाणे चोपडा-60, रावेर-67, भुसावळ-46, जळगाव शहर- 45, जळगाव ग्रामीण-58, अमळनेर- 62, एरंडोल-60, चाळीसगाव- 58, पाचोरा-57, जामनेर-63 आणि मुक्ताईनगर-64 मतदान झाले आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात अंदाजे 58 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघासाठी एकुण 100 उमेदवार रिंगणात आहेत. सुलभ निवडणूक हे ब्रीद घेऊन निवडणूक आयोगाने यावर्षी दिव्यांग मतदारांना विशेष व्यक्तींचा दर्जा दिल्याने दिव्यांग मतदार, महिला मतदार, नवमतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदान केल्याने जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 3586 मतदार केंद्रांवर सकाळी मॉकपोल घेऊन सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधांसह पाळणाघराची देखील व्यवस्था करण्यात आली होती. तर काही ठिकाणी पालकांसोबत मतदान केंद्रावर आलेल्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी खेळणी व खाऊचीही व्यवस्था करण्यात आली होती. पाळणाघरात अंगणवाडी सेविका लहान मुलांची काळजी घेत होत्या.

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात 11 मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रावर महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे गुलाबपुष्प देऊन व औंक्षण करुन स्वागत करण्यात येत होते.

रावेर येथील सखी मतदान केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांनी फेटे परिधान केले होते. अनेक ठिकाणी मतदारांचे औक्षणही करण्यात येत होते. तसेच अनेक मतदार केंद्रावर सेल्फी पॉईंट ठेवण्यात आले होते. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र तयार करण्यात आले होते. या केंद्रावर मतदान केंद्रावर मतदारांना त्यांचे नांव शोधण्यासाठी मदत करण्यात येत होती. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, शौचालयाची व वैद्यकीय सुविधेसह निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हिल चेअर ने आण करणे साठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याच बरोबर ज्येष्ठ नागरीकांना मदत करण्यासाठी स्काऊट गाईडची मुले विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मदत करीत होते.

या निवडणूकीत मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आल्याने मतदाराला आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे व्हीव्हीपॅट मशीनविषयीही मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. आपण मतदान केलेल्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी स्क्रिनवर बघायला मिळत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. या निवडणूकी मध्ये जिल्ह्यातील अंदाजे 39 हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आलेली होती हे नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असल्यामुळे त्यांचे चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता.

निवडणूकीच्या काळात जिल्ह्यात कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त पोलीस विभागामार्फत ठेवण्यात होता. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना मतदान केंद्रावरील पोलीस सहकार्य करीत असल्याचे दिसून येत होते.