उद्योग, जळगाव, व्यापार

वजनमापे विभागाच्या चार सेवा झाल्या ऑनलाईन

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

जळगाव (प्रतिनिधी)।  शासनाच्या उद्योग सुलभता धोरणाच्या अनुषंगाने वैधमापन शास्त्र कार्यालयाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्यास सुरुवात झालेली आहे. मागील वर्षी वजने मापे उत्पादन, दुरुस्ती व विक्री परवाने ऑनलाईन कामानंतर आता वजने व मापे उपयोगकर्त्यांचे पडताळणी प्रमाणपत्रासह इतर तीन सेवा देण्याचे कामकाजही ऑनलाईन करण्यात आले आहे. अशी माहिती रा. भ. बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र यांनी दिली आहे.

  • Online Add I RGB
  • new ad
  • advt tsh 1
  • advt atharva hospital
  • vignaharta

यासाठी विभागाच्या जिल्ह्यातील सर्व निरीक्षकांना स्वतंत्र लॅपटॉप व इंटरनेट कनेक्शन देण्यात आलेले आहे. निरीक्षकांनी संबंधित वजने मापे उपयोगकर्त्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यास यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता वजनमापे उपयोगकर्ता व त्यांचेजवळ असलेले वजनमापे यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील वजनमापे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांना ऑनलाईन पध्दतीने परवाने दिले जात आहेत. व परवान्यांचे नुतनीकरण ही ऑनलाईन पध्तीने केले जात आहे. त्यासाठी परवानाधारक यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.  आवश्यक असलेली माहिती ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर अन्वेषणासाठी संगणकीय सोडत पध्दतीने जिल्ह्यातील कुठल्याही अधिका-यास वाटप करण्यात येते. एकाच परवानाधारकाचे अन्वेषण त्याच अधिका-यास सलग दोन वेळा न देण्याची तरतुदही संगणकीय प्रणालीमध्ये करण्यात आली आहे. अन्वेषणाची कार्यपध्दती व तपासणी सुची तसेच परवाना देणे, नुतनीकरण करणे, परवान्यात फेरफार करणे. यासाठीची कार्यपध्दती व आवश्यक ती कागदपत्रे यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या अगोदर वजनमापे उपयोगकर्त्यांची वजनमापे मुदत संपल्यानंतर संबंधित निरीक्षकांमार्फत पडताळणी व मुद्रांकन होऊन ऑफलाईन पध्दतीने प्रमाणपत्र दिले जात होते. या कामासाठी बराच वेळ जात होता. आता मात्र पडताळणी प्रमाणपत्रांचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने सुरु झालेले आहे. त्यासाठी प्रथम वजनमापे उपयोगकर्त्याची माहिती संगणक प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अपलोड केल्यानंतर वजनमापे प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. तसेच संबंधित उपयोगकर्ता यांना नोंदणी करणेबाबत अलर्ट मेसेजही पाठवला जाणार आहे. वैधमापन यंत्रणेच्या संगणकीकरणाची प्रक्रिया सुरु झालेली असल्याने यापुढे वजनमापे उत्पादक/ दुरुस्तक/विक्रेते यांचे नविन परवाने देणे व त्या परवान्यांचे नुतनीकरण करणे. वजनमापे यांचे परवान्यामध्ये फेरबदल, आवेष्टित वस्तुंचे उत्पादक/आवेष्टक/आयातदार यांची नोंदणी व नोंदणीत फेरफार करणे, नामनिर्देश नोंदणी प्रमाणपत्र या सेवा केवळ ऑनलाईन सेवेव्दारेच उपलब्ध राहतील, यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे श्री. रा. भ. बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.